कोणत्याही निवडणुकीत चिन्हाला मोठं महत्त्व आहे. काँग्रेस पक्षाचं निवडणूक चिन्ह (Election Symbol of Congress) 'हात' सर्वांच्या परिचयाचं आहे. पण एका गडबडीमुळे काँग्रेसचं पक्षचिन्ह हात नाही तर हत्ती झालं असतं हे तुम्हाला माहिती आहे का? आंध्र प्रदेशसह काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार होत्या. त्यावेळी निवडणूक आयोगानं इंदिरा काँग्रेसला गाय-वासरू या चिन्हाऐवजी नवीन चिन्ह निवडण्याचे निर्देश दिले. काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री बुटासिंग (Buta Singh) यांनी आंध्र प्रदेशमध्ये प्रचार दौऱ्यावर असताना इंदिरा गांधींना (Indira Gandhi) फोन केला. त्यांनी इंदिराजींना सांगितलं की आयोगाने कॉंग्रेसला हत्ती, सायकल आणि हात या पैकी एक चिन्ह निवडण्यास सांगितलं आहे, असं कळवलं. त्यावर इंदिरा गांधींनी राजरत्नम या सहकाऱ्याला 'हात' हे चिन्ह निवडून तसं बुटासिंग यांना फोनवर कळवण्याची सूचना केली. पण फोन लाईनमध्ये गडबड असल्यानं बुटासिंह यांना 'हाथी' असं ऐकू आलं. ते फोनवर “हाथी हाथी” असं म्हणू लागले. बुटासिंग यांना कसं समजवायचं हा प्रश्न इंदिराजींना पडला होता. त्यावेळी शेजारी असणाऱ्या पीव्ही नरसिंहराव (P.V. Narasimha Rao) यांनी फोन घेतला आणि बुटासिंगना स्पष्ट शब्दात इंदिराजी 'हाथ' म्हणतायत, असं कळवलं. थोडक्यात पी व्ही नरसिंहराव यांच्यामुळे काँग्रेसला हात हे चिन्ह मिळालं नाहीतर बुटासिंग ह्यांच्या गडबडीमुळे हत्ती हे चिन्ह मिळालं असतं.